आतापर्यंत 65 बाधित आढळले : पालिका आणि व्यापारी महासंघाचा पुढाकार
पुणे – करोना रोखण्यासाठी महापालिका आणि पुणे व्यापारी महासंघाकडून गेल्या आठवड्यापासून व्यापारी पेठेतील दुकानातील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत 2,210 कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 65 कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून या चाचण्या करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मध्यभागातील एका शाळेतील आवारात करोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कापड बाजार, सराफ बाजार, मेटल, पेपर, टूल्स अशा व्यावसायिकांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ भागातील व्यावसायिकांच्या दुकानातील हे सर्व कर्मचारी आहेत.
करोनाबाधित कर्मचाऱ्यांचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी दिली. या शिबिरासाठी भगत ताराचंदचे दिनेश सांकला, शिक्षण प्रसारक मंडळीचे पदाधिकारी ज्येष्ठ विधीज्ज्ञ ऍड. एस. के. जैन, शाळेतील मुख्याध्यापिका ओंबासे यांनी सहकार्य केली.
शाळेचे आवार तसेच वापरण्यात आलेले वर्गात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यासाठी सुनील शहा यांनी सहकार्य केले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सहायक आयुक्त आशीष महाडदळकर यांनी नियोजन करून व्यापारी महासंघास सहकार्य केले.
नितीन काकडे, मिलिंद शालगर, नरेश राठोड, मनोज शहा, नितीन पोरवाल यांनी शिबिराचे नियोजन केले. दुकाने खुली ठेवली तर करोनाचा संसर्ग वाढतो, असा गैरसमज होता. व्यापारी यापुढील काळात योग्य ती काळजी घेऊन व्यापार करणार आहेत. प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे रांका आणि पितळिया यांनी सांगितले.