वुहान: चीनमध्ये करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी दिवसेंदिवस मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हायरसचा संसर्ग होत असून वुहानमध्ये आणखी एका डॉक्टराचा मृत्यू झाला आहे.
पेंग येन्हुआ हे 29 वर्षीय डॉक्टर जिआंगझिआ रुग्णालयात रुग्णांवर उपचार होते. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पेंग यांनी आपले लग्न पुढे ढकलले होते. डॉक्टर पेंग यांना 25 जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 30 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती आणखीच खालावली. त्यावेळी जिनियतन रुग्णालयात उपचार करण्यात आले. अखेर गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, वुहान येथील वुचांग रुग्णालयाचे संचालक डॉ. लियू झिमिंग यांचा 18 जानेवारी रोजी करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. डॉ. लियू झिमिंग हे देखील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होते. त्यावेळी त्यांना करोनाचा संसर्ग झाला. तर, 6 फेब्रुवारी रोजी करोना व्हायरसची माहिती देऊन सावध करणारे डॉक्टर ली वेनलियांग यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.