राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून तालुका त्रिशतकाच्या जवळ पोहोचला आहे. तर तालुक्यात एकमेव कोविड सेंटर महाळुंगे इंगळेमध्ये असून तिथे केवळ 50
जणांचेच स्वॅब घेतले जातात. तर चांडोली ग्रामीण रुग्णालयातील स्वॅब सेंटर व 65 खाटा धूळखात पडून आहे. त्यातच भयानक स्थिती म्हणजे रुग्णवाहिका नसल्याने करोना संशयित रुग्ण स्वॅब चाचणीसाठी थेट दुचाकीने कोविड सेंटर गाठत असल्याने करोनाचा संसर्ग आणखी तीव्रतेने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मार्च महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्यानंतर तब्बल दोन महिने तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला नव्हता.
मात्र, जस जसे लॉकडाऊनचे नियम शिथील होत गेल्याने मे महिन्यापासून करोनाचा शिरकाव होण्यास सुरूवात झाली. तर आता दिवसाला जवळपास 30 ते 40 रुग्ण आढळून येत असल्याने चाकण, राजगुरूनगर, आळंदी शहरांसह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेडमध्ये आतापर्यंत 275वर बाधित रुग्णाची संख्या गेली आहे. तालुक्यात महाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू आहे; मात्र येथे दररोज फक्त 50 जणांचेच स्वॅब घेतले जातात. त्याचा अहवाल तीन किंवा चार दिवसांनी येतो. त्यामुळे रुग्णांचे विलगिकरण लवकर होत नसल्याने संसर्ग वाढत चालला आहे.
तर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने संशयित रुग्णाला थेट बोलवले जात असल्याने अनेकजण दुचाकीवरून येत आहेत. यातील एखाद्याला जरी संसर्ग असेल तर रस्त्याने जा-ये करणाऱ्यांसाठी ते धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन तालुक्यात ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
चांडोली, चाकण, आळंदीचा प्रस्ताव लालफितीत
करोनाचे निदान लवकवर व्हावे म्हणून सुरुवातीला तालुक्यातील चांडोली, चाकण, आळंदी येथील रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर उभारणीची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. त्यासाठी खाटा (बेड) ही सज्ज करण्यात आले होते. तर त्यासाठी लागणरे डॉक्टर, साहित्य, सामग्री आदींसाठी अंदाजे लागाऱ्या
खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. पण सुवातीला रुग्ण आढळले नाही त्यानंतर रुग्णवाढीचा वेग मंद होता. तर महाळुंगे इंगळे येथे एक सेंटर उभारल्याने इतर प्रस्ताव केवळ धूळखात पडून असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, आता रुग्णांच्या संख्येत झापट्याने वाढ
होत असल्याने या प्रस्तावाची आता सगळ्यांना आठवण झाली आहे. मात्र, हे प्रस्तावित सेंटर सध्या तरी लालफितीत अडकले असल्याने ते सुरू होणार की नाही हे “रामभरोसे’च म्हणावे लागले.
चांडोली येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी 2 कोटी 92 लाख खर्चाचा अहवाल प्रांताना दिला असता कमी खर्चाचा अहवाल द्यावा अशा सूचना आल्यावर आम्ही 1 कोटीपर्यंत दिला. अद्याप पुढे काहीच कार्यवाही नाही.
–डॉ. दीपक मुंढे, वैद्यकीय अधीक्षक, चांडोली ग्रामीण रुग्णालय
मन्युष्यबळ कमी पडले म्हणून आम्ही इतर कोव्हिड सेंटर सुरू केले नाही. तर महाळुंगेचे सेंटरही पूर्ण क्षमतेने अद्याप भरलेले नाही. जरी रुग्ण वाढले तरी सर्व सोयी-सुविधांनी आम्ही सज्ज आहोत. चांडोलीचे केव्हिड सेंटर सोमवार (दि. 13) पासून सुरू करणार आहोत.
– संजय तेली, प्रांताधिकारी