करोना संशयित होताहेत ‘गायब’

महापालिका, पोलिसांची तारांबळ : मोबाइल लोकेशनवरून दोघांचा शोध

पुणे – मंगळवारी सकाळी खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या व्यक्‍तींना करोना सदृश लक्षणे असल्याने संबंधित रुग्णालयाकडून या दोन संशयितांना डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, हे दोन्ही संशयित नायडूमध्ये न जाता गायब झाल्याने पोलीस प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांची त्यांना शोधताना चांगलीच तारांबळ उडाली. अखेर मोबाइल लोकेशनवरून त्यांना पकडून आणत नायडू रुग्णालयात दाखल केले.

येरवडा आणि भवानीपेठ भागातील हे 2 रुग्ण असून सकाळी आपल्या भागातील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना करोना सदृश लक्षणे असल्याने त्यांना एक्‍स रे काढण्यासाठी संबंधित डॉक्‍टरने पाठविले. तसेच, रिपोर्ट घेऊन त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याचवेळी या डॉक्‍टरांकडून ही माहिती डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयास कळविण्यात आली. त्यामुळे दोन रुग्णांची वाट रुग्णालयात पाहिली जात होती.

मात्र, हे रुग्णच आले नसल्याने आरोग्य विभागाने तातडीने याची गंभीर दखल घेत पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर दोन्ही रुग्णांचे मोबाइलही बंद होते. मात्र, सकाळी काही तासांनंतर एका रुग्णाचा मोबाइल क्रमांक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून संबंधित रुग्णास तातडीने नायडूत दाखल केले, तर दुसऱ्या रुग्णांने आपला मोबाइल क्रमांक बंद केला असून त्याचा पत्ता शोधण्याचे काम सायंकाळी सुरू होते. त्यामुळे अशाप्रकारे संशयित भीतीपोटी गायब होत असल्याने करोना रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला अडचणीचा सामना करवा लागत आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी

अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या तसेच तपासणीसाठी येण्याऐवजी गायब होणाऱ्या संबंधित व्यक्‍तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्‍तांकडे करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी दिली. आरोग्य यंत्रणेकडून अहोरात्र या साथीला अटकाव घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत हे नागरिक बेजाबदारपणे वागत आहेत. त्यांच्या आजाराचे लवकर निदान झाल्यास आणि त्यांनी वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता प्रशासनाला सहकार्य करणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.