पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे मिळालेल्या करोनाबाधित महिलेच्या आई-वडिलांचे स्त्राव आज प्रथमच पाथर्डी येथे उभारण्यात आलेल्या श्री तिलोक शाळेतील कोविड-19 सेंटरमध्ये घेण्यात आले असून ते तपासणी करण्यासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहेत. तर तालुक्यातील दोन करोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे मुंबईहून आलेली 22 वर्षीय गरोदर महिला कोरोनाबाधित आढळून आली होती.मात्र, या महिलेच्या घरच्यांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कात जास्त कुणी आलेले नाही. मुंबईहुन महिलेच्या सोबत आलेल्या भावाची देखील तपासणी करण्यात आली असून त्याचा देखील रिपोर्ट रविवारी सकाळी निगेटिव्ह आला आहे.
तसेच संबंधित महिलेच्या आई-वडिलांची देखील तपासणी करण्यात आली असून रविवारी सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन शिंदे व डॉ. संतोष बोरुडे या दोन्ही डॉक्टरांनी संबंधित त्या दोघांचे स्त्राव पाथर्डी येथील श्री तिलोक शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड-19 सेंटरमध्ये घेण्यात आले. त्यानंतर ते तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. यावेळी डॉ.अतुल बांगर हे उपस्थित होते. तर दुसरा निगेटिव्ह अहवाल पिंपळगाव टप्पा येथील एका तरुणाचा आला आहे.
संबंधित रुग्ण मुंबईहून काही दिवसांपूर्वी गावाकडे आला होता. त्याला थोडासा त्रास झाल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली. मात्र,तो निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
तसेच तालुक्यातील वडगावं येथे पनवेलहून आलेल्या एका तरुणाचा स्वब जिल्हा रुग्णालयात घेण्यात आला असून त्याचा अहवाल काय येतोय याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,मुख्याधिकारी धनंजय कोळेकर आदी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तालुक्यातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.