स्मशानात नात्याची नवी ओळख

रक्‍ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याची बेल्हेकरांना प्रचिती

बेल्हे (पुणे) – करोनाच्या काळात रक्‍ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असते याची प्रचिती वारंवार येत आहे. अशीच प्रचिती बेल्हेकरांना आली आहे.

बेल्हे (ता. जुन्नर) येथे 70 वर्षीय आजी एकट्याच राहत होत्या. तीन दिवसांपूर्वी त्यांना थंडी, ताप, सर्दी, खोकला अशी करोना सदृश्‍य लक्षणे दिसत होती. त्यामुळे चुलत भावाच्या दोन मुलांनी त्यांना बेल्हे येथील एका खासगी डॉक्‍टरकडे नेले होते. औषध उपचार करून आजी घरी आल्या; परंतु सोमवारी (दि. 14) आजीला पुन्हा डॉक्‍टरकडे नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

आजी करोना संशयित असल्याने कोणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाही. रक्‍ताचेच नाते पुढे आले नाही, त्यामुळे अन्य कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना. अखेर अंत्यविधीसाठी पुढे कुणी येत नसल्याचे पाहून स्वप्नील भंडारी यांनी फोन लावून ग्रामपंचायत सदस्य गोट्याभाऊ वाघ यांना माहिती दिली.

आधीपण घेतला होता पुढाकार…

रक्‍ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीच नात कसे श्रेष्ठ असत हे गोट्याभाऊ यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या आधीही गोट्याभाऊ यांनी नारायणगाव येथे एका करोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार केले होते, त्यामुळे बेल्हे ग्रामस्थांनी करोना योद्धा गोट्याभाऊ यांच्या कामाला सलाम केला आहे.

त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुढाकार घेतला व स्व खर्चाने पीपीई कीट खरेदी करून या 70 वर्षीय आजींवर बेल्हे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. गावचे माजी तंटामुक्‍ती अध्यक्ष स्वप्नील भंडारी, अण्णा गाडेकर यांनीही गोट्याभाऊ यांना मदत केली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.