वाघोली (प्रतिनिधी) : पुणे शहर परिसरामध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाने शहराच्या जवळ असणाऱ्या वाघोलीमध्ये शिरकाव केला असून कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण वाघोली परिसरामध्ये आढळला आहे. ४५ वर्षीय रुग्णाने स्वतःहून खाजगी लॅब मध्ये केलेली कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे.
संबंधित रुग्ण व त्याच्या घरातील आणखी तिघे व रुग्णाच्या सतत संपर्कात आलेला असे एकूण ५ जणांना तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने वाघोली परिसरामध्ये खळबळ उडाली असून संबंधित परिसर पोलिसांनी सील करून ग्रामपंचायतीने औषध फवारणी केली आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गायरान परिसरामध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय चालकाला एक ते दीड महिन्यांपासून खोकल्याचा त्रास होता. पाच दिवसापूर्वी सर्दी व थकवा जाणवत असल्याने त्याने वाघोलीतील एका खाजगी दवाखान्यात गोळ्या-औषधे घेतली. त्याचप्रमाणे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील जाऊन आल्याचे समजते.
घरातील कुटुंबीयांनीच त्यांची खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट करण्याचे ठरविल्यानंतर १२ एप्रिलला चालकाचे घश्याचे नमुने घेण्यात आले. १५ एप्रिलला सकाळी त्याची टेस्ट पॉजिटीव्ह आल्याचे समजताच शासकीय यंत्रणेसह सर्वांचीच पळापळ सुरु झाली. त्याला तात्काळ वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणल्यानंतर माहिती घेऊन उपचारासाठी नायडू रूग्णालयात पाठविण्यात आले. संबंधित रुग्णाची पत्नी, दोन मुले व सतत संपर्कात आलेल्या एकाला देखील तपासणी साठी पाठविण्यात आले. सर्वांची पुन्हा एकदा नायडू रुग्णालयाकडून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
संशयित सापडलेला रुग्ण झोपडपट्टी परिसरातील असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणीकंद पोलीस व ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने संशयित रुग्णाचे घर व संपूर्ण परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी परिसर सील केला असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. संशयित रुग्णाची तपासणी करणारे डॉक्टर व त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहे.
वाघोली बंदचे जाहीर आवाहन
वाघोलीमध्ये संशयित रुग्ण सापडला असल्याने व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार (दि.१६) पासून पुढील आदेश होईपर्यंत वाघोली गाव स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्याचा निर्णय कोरोना विषाणूवरील गाव पातळीवरील सनियंत्रण समितीने घेतला आहे. सोशल डीस्टन्सिंग पाळावे व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मेडिकल, दवाखाने, दुध पुरवठा व पशु संबंधी सेवा सुरु राहतील व इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूसंबंधी काही अडचणी असल्यास ग्रापंचायत व स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधावा.
संशयित रुग्णाच्या परिसरात तरुणांनी उभारला होता चेकनाका
कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेल्या गायरान परिसरामध्ये गांजा व अवैध दारू विक्री संदर्भात नागरिकांच्या हालचाली वाढत असल्याने स्थानिक तरुणांनीच चार दिवसापूर्वी चेकनाका उभारला होता. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची चौकशी करून अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना दांडक्याचा प्रसाद दिला जात होता. याच परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारी घेण्यासाठी वाघोली परिसरामध्ये ठीकठिकाणी तरुणांनी गल्ली बोळ तसेच मुख्य परिसरामध्ये चेकनाके उभारले असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे.
प्रतिक्रिया
सदर रुग्णाची खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याच्या रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे, त्यानुसार त्याला नायडू रुग्णालयात पाठवले आहे. तो राहत असलेला परिसर विशेष खबरदारी घेण्यासारखा भाग असल्यामुळे अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे.
– डॉ. वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, वाघोली
पोलिस प्रशासकडून या परिसरावर करडी नजर ठेवण्यात येत आहे, परिसर सील करण्यात आला आहे. लोकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
– प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक
वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने पुढील काही दिवस वाघोली पुर्ण पणे बंद ठेवण्यात येईल. परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येईल.
– वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली