घरातील पॉझिटिव्ह ठरताहेत ‘सुपर’स्पेडर

महापालिका आयुक्त शंकर गोरे; पदाधिकारी, नगरसेवकांनीच सहकार्य करायला हवे असल्याची भावना

नगर – करोनाबाधित झाल्याची लक्षणे आढळून आल्यानंतर काहीजण तपासणी करतात. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही ते घरातच विलगीकरणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सर्वात घातक असून, तेच सुपरस्पेडर असल्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी ‘प्रभात’शी बोलताना मांडली.

नगर महानगरपालिका व सामाजिक संस्थांमार्फत नगर शहर व परिसरात उभारण्यात आलेल्या अनेक कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेेण्यासाठी बेड शिल्लक आहेत. तेथेच हे करोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यास त्यांचे घर व परिसरात अन्य कुणाला नव्याने लागण होण्याची शक्यता कमी होते. तथापि, बहुतेक नागरीक कोविड रुग्णालयांत जागा नसल्याच्या सबबीवर घरातच उपचार घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसर्‍या लाटेतील विषाणू पहिल्यापेक्षा थोडा घातक आहे. तो संपूर्ण परिवार व परिसर पॉझिटिव्ह करु शकतो. त्यामुळे कोणत्याही सबबीवर किंवा घरात डॉक्टर असतील, तरी देखील ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यांनी घरातील विलगीकरणात राहू नयेच. महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी देखील याकडे लक्ष देऊन मदतीचीच भूमिका घ्यायला हवी, अशी कळकळीची विनंती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केली आहे.

अलिकडेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता घरातील विलगीकरण सक्तीने बंद करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्याकडेही वैद्यकीय दृष्टीने पाहण्याऐवजी अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील एका कुटुंबातील काही दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या यंत्रणेने फोन करुन इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच भागातील एका नगरसेवकाने महानगरपालिका कर्मचार्‍यांनाच दमदाटी करत पुन्हा फोन करु नका, असे फर्मान सोडले. असे बेपर्वा नगरसेवकच करोनाचा आलेख वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याची भावना महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी ‘प्रभात’शी खासगीत बोलताना व्यक्त केली.

 समर्थकांच्या लसीकरणासाठी नगरसेवकांचा दबाव; महानगरपालिका कर्मचारी तणावात

महापालिका कर्मचार्‍यांकडून सध्या लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्यात प्रशासनाकडूनच लसींचा कोटा कमी मिळतो. त्यामुळे  कर्मचार्‍यांसमोर अडचणी आहेत. ज्यांनी सकाळपासून रांगेत थांबून लसीसाठी नोंदणी केली आहे, अशा नागरीकांना ते प्राधान्याने लस देण्याचा प्रयत्न करत आहेत.

तथापि, माळीवाडा भागातील एका नगरसेवकाने आज जुन्या महापालिका कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दमबाजी करत त्यांच्या समर्थकांचे लसीकरण अगोदर करण्यास भाग पाडले. त्यामुळे महापालिका कर्मचारीही जीव मुठीत धरुन काम करत असल्याची भावना एका कर्मचार्‍यांने ‘प्रभात’शी बोलताना मांडली. याच नगरसेवकाने मागे एकदा एका वरिष्ठ कर्मचार्‍याच्या पोटाला चाकू लावून दम देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.