मोठी बातमी! परदेशांतील करोना स्ट्रेन महाराष्ट्रात सध्या नाही

ससूनमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट सुरू

पुणे – आता ससून सर्वोपचार रुग्णालयात “जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट’ (जनुकीय बदल) सुरू करण्यात आल्या असून, चार ठिकाणच्या टेस्टमधून सुदैवाने ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन यात आढळला नाही, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी गुरूवारी सांगितले. तपासणीअंती सापडलेला स्ट्रेन हा “लोकल’च असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

 

 

आजपर्यंत “एनआयव्ही’ आणि बंगळुरू मधील एका संस्थेमध्ये या टेस्ट केल्या जात होत्या. मात्र त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात ताण येत आहे. त्यातून पुण्यासह, अमरावती, यवतमाळ आणि सातारा या चार ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत असून तेथील “जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट’ ससूनमधील प्रयोगशाळेत करण्यासंबंधीच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्या. त्यानुसार ससूनमधील तीन संशोधक डॉक्टरांना बंगळुरू येथे पाठवून याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

 

यामध्ये पुण्यातील 12 तर अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी चार असे 24 नमुने घेण्यात आले. चारही ठिकाणी ब्राझील, ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिका येथील स्ट्रेन आढळून आले नाही. मात्र पुणे सोडून अन्य ठिकाणी “लोकल जिनोम सिक्वेन्सिंग’ आढळले आहेत. एकूणच परदेशांतील म्युटेशन झालेले कोणतेच स्ट्रेन आढळले नसून, त्यांच्यात “लोकल’ म्हणजे भारतीय स्ट्रेनच दिसल्याचे, डॉ. तांबे आणि उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. या तपासणीत डॉ. अथिरा जयराम, डॉ. व्ही. सुषमा व डॉ. स्मृती शेंडे हे डॉक्टर संशोधक सहभागी झाले होते.

 

परदेशांतून आलेल्यांचे नमुने दोन आठवड्यापूर्वी घेऊन त्याची “जिनोम सिक्वेन्सिंग’ टेस्ट करण्यात आली आहे. त्यांच्या तपासणीतून सापडलेल्या या लोकल स्ट्रेनपासून फारसा धोका नाही, तरीही नागरिकांनी काळजी घेणे आवश्यकच आहे.

– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.