दौंड-राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच येथे सहायक फौजदार यांचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर 16 दिवसांनी त्यांच्या उपचारासाठी औषधे खरेदी केल्याचे मेडिकल बिल देण्यात आले आहे. मेडिकल तसेच रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका ज्योती अजय राऊत यांनी केली आहे. हे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य चिकित्सालय औंध पुणे यांच्याकडे दिले आहे.
कुरकुंभ येथील सहायक फौजदार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच येथे सहायक फौजदार पदावर कार्यरत होते. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दि. 23 ऑगस्ट रोजी दौंडच्या योगेश्वरी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ते पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. उपचारानंतर 28 ऑगस्टला गिरमे यांना घरी सोडण्यात आले.
मात्र, पुन्हा काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी याच रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयाच्या सक्तीने पुन्हा त्याच मेडिकलमधील औषधे घेतली. उपचार सुरू असताना 3 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले होते.
दरम्यान, औषधे तसेच रुग्णालयाचे बिल अदा केल्यानंतर रूग्णालयाने त्याचा मृतदेह नातेवाईकाच्या
ताब्यात दिला. त्यानंतर गावी नातेवाइकाच्या उपस्थितीत गिरमे यांच्यावर अंत्यसंस्कार केला. ते शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना वैद्यकीय बिलाची रक्कम शासनाकडून मंजूर होऊन पुन्हा मिळते. यात रूग्णालय आणि मेडिकल याची बिले महत्वाची असतात.
यासंदर्भात डॉक्टर व मेडिकलकडे फाईलची मागणी केली. सुरूवातीला टाळाटाळ केली. पाठपुराव्यातून रूग्णालय व मेडिकल यांच्या सही व शिक्का असलेली बिले (फाईल) दिली. मात्र, त्यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी त्यांच्या उपचारासाठी दि. 17 सप्टेंबरला औषधे खरेदी केल्याचे या बिलावर दर्शविले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयाना शासकीय वैद्यकीय बिलाची रक्कम कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहायक फौजदार यांच्या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहेत.
– डॉ. संग्राम डांगे,
वैद्यकीय अधीक्षक, दौंड उपजिल्हा रुग्णालय.