वुहान : चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच आता चीनमधूनच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. कारण आता चीनमध्ये कोरोनाचे ६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन व्यक्ती या चीनमधीलच असून उर्वरीत ६१ जण हे परदेशातून चीनमध्ये दाखल झालेले आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाची लाट परसण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एकाच दिवसात ६३ नवे रुग्ण अढळून आले आल्याने चीनची चिंता वाढली आहे.
चीनमधील अनेक भागांमध्ये मागील दोन महिन्यापासून लागू करण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर देशामधील कोरनाबाधितांचा आकडा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे बुधवारी चीनमध्ये दोन जणांचा मत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मत्यू झालेल्यांची चीनमधील संख्या तीन हजार ३३५ इतकी झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८१ हजार ८६५ इतकी झाली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) गुरुवारी जाहीर केलेल्या एका पत्रकामध्ये देशात ६३ नवे करोना रुग्ण अढळून आल्याची माहिती दिली आहे. परदेशातून चीनमध्ये दाखल झालेल्या ६१ नागरिकांचाही यामध्ये समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये नव्याने करोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मागील काही आठवड्यांपासून अगदीच कमी झाले होते.