करोना, निर्बंध आणि संभ्रम; परीक्षा देऊ, की गावाकडे जाऊ?

स्पर्धा परीक्षा उमेदवार हतबल, दि. 11 रोजीच्या परीक्षेबद्दल प्रश्‍नचिन्ह कायम

पुणे – शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे दि. 11 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी संयुक्‍त पूर्व परीक्षेविषयी एक-दोन दिवसांत राज्य सरकार भूमिका स्पष्ट करणार आहे. असे असले, तरी पुण्यात सायंकाळी सहानंतर संचारबंदी आहे. करोना प्रादुर्भावात परीक्षा द्यावी,की गावाकडे जावे, अशा द्विधा मनस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार सापडले आहेत.

जेवणाची अडचण
करोनामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. सायंकाळच्या निर्बंधांमुळे अनेक उमेदवारांना जेवण मिळणे कठीण झाले आहे. जेवणासाठी पार्सलची सुविधा असली, तरी सायंकाळी सहापूर्वीच त्याची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.

लक्षणे असल्यास तत्काळ उपचार घ्या
येत्या रविवारी एमपीएससी संयुक्‍त पूर्व परीक्षा असल्याने काही उमेदवार करोनाची लक्षणे दिसत असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. क्वारंटाइन करतील, परीक्षा देता येणार नाही म्हणून विद्यार्थी किरकोळ औषधी घेऊन आजार अंगावर काढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे परीक्षा पुन्हा देता येईल, पण आरोग्याची बेफिकिरी परवडणार नाही. त्यासाठी लक्षणे दिसताच वेळीच उपचार घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

उमेदवाराचा करोनाने मृत्यू, मित्रांना धक्‍का
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उमेदवाराचे करोनामुळे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. हा उमेदवार “एमपीएससी आंदोलनात’ सहभागी होता. आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. परंतु शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची पुण्यात तयारी करत होता. वेळेत परीक्षा होण्यासाठी आंदोलन केले, मात्र त्याच परीक्षेला करोनामुळे त्याला बसू शकता नाही, अशी व्यथा त्याच्या मित्रांनी मांडली.

संसर्गाची भीती
शहरात रोजच्या नव्या करोना बाधितांचा आकडा 6 हजारांवर गेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो उमेदवार पुण्यात आहेत. सायंकाळच्या संचारबंदीमुळे आता खोलीतच अभ्यास करावा लागत आहे. एकाच रुममध्ये अनेकजण राहत असल्याने संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता उमेदवारांमध्ये करोनाविषयी भीतीचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.