सातारा : कोरोनाच्या चारपैकी एका अहवालामध्ये वेगळी लक्षणे

नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे

सातारा – कोरेगाव तालुक्यातील चार संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका आवाजात लक्षणे वेगळी दिसून येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वांनीच घाबरून न जाता खबरदारी घेण्याची गरज आहे असे सांगून डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील चार संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तीन जणांचे अहवाल नियमित असून चौथ्या व्यक्तीमध्ये वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. ती कशाची लक्षणे आहेत याबाबत अभ्यास करण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यातील अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने शुक्रवारी स्पष्ट केल्यानंतर सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी कोरेगाव तालुक्यातील चारपैकी एका रुग्णात वेगळी लक्षणे आढळल्याचे सांगितल्यामुळे कोरोनाची धास्ती वाढली आहे.

नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे येत्या काळात खूप काळजी घेणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.