शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील अण्णापुर येथील स्थानिक पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली . तर या रुग्णाने शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यामुळे अण्णापुर गाव, शिरूर शहर व शिरूर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे, तर नागरिक भयभीत आहेत. शिरूर येथील एका खासगी दवाखान्यात या रुग्णाने उपचार केले असल्याने शिरूर शहरातही खळबळ उडाली आहे.
आजपर्यंत शिरुर शहर व शिरूर पंचक्रोशी मध्ये हा पहिलाच कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. अण्णापूर गावातील अनेक नागरिकांची शिरूर शहर व पंचक्रोशी मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने सर्वांना सतर्क रहाण्याची वेळ आली आहे.
अण्णापूर येथे राहणाऱ्या पुरुषाला त्रास होत असल्याने शिरूर येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले त्यांनी तेथे उपचार घेतले आहे. तर तेथे जवळच असणाऱ्या एका लॅब मध्ये त्याने एक एक्स-रे काढल्याचे सांगितले. दरम्यान, या व्यक्तीचा संशय आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज आला असून त्यात हा पुरुष कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
शिरूर प्राथमिक रुग्णालयाची टीम अण्णापूर गावात गेली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी घाबरून जाण्याचे कारण नाही, सुरक्षित रहा शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन या वेळी केले. तसेच अण्णापूर गावामध्ये ज्या भागात हा रुग्ण राहतो तेथे काही ठाणे (मुंबई ) येथून लोक आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.