वॉशिंग्टन – करोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले आहे. उद्योगधंदे, विमान वाहतूक, माल वाहतूक, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. करोनामुळे जीवितहानी व आर्थिक नुकसानीच्या बातम्या समोर येत असताना एक सकारात्मक बातमीही समोर आली आहे. चीनमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी सॅटेलाईट छायाचित्र प्रकाशित केले आहे. त्यातून चीनबद्दलची ही माहिती उघड झाली आहे. चीनमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी खालावली आहे. जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात बीजिंग व जवळपासच्या शहरात नायट्रोजन डायऑक्साईडचे चांगलेच प्रमाण होते. त्यानंतर 10 ते 29 फेब्रुवारीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये हे प्रमाण लक्षणीय रीत्या खालावले असल्याचेही संशोधकांना आढळून आले.
चीनमध्ये डिसेंबर 2019 अखेरीस करोना विषाणूबाबत पहिल्यांदा माहिती समोर आली. त्यानंतर काही दिवस करोनाची भीषणता कोणाच्याही लक्षात आली नव्हती. त्यानंतर करोनामुळे अनेक शहरात निर्बंध लादण्यात आले. हुबेई प्रांतात आणि त्याची राजधानी असलेल्या वुहानमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला होता. त्यानंतर या शहरातील सार्वजनिक-खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली. उद्योग, कारखानेही बंद ठेवण्यात आले होते. त्याच्या परिणामी हवेतून नायट्रोजन डायऑक्साईड कमी झाला असल्याचे सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहे.
एका विशिष्ट कारणास्तव एखाद्या क्षेत्राच्या हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचे मी प्रथमच पाहिले असल्याचे असल्याचे नासाच्या संशोधकांनी सांगितले. याआधी 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे काही देशांमध्ये नायट्रोजन डायआक्साइडची पातळी खाली आली होती. परंतु, त्यावेळी प्रदुषणाच्या पातळीत घट ही आजच्या तुलनेच खूपच कमी होती.