पुणे – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी यामुळे पर्यावरण क्षेत्रासाठी एक दिलासादायक घटना घडत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील बहुतांश देशांनी आपली हवाई वाहतूक रद्द केल्याने, तसेच काही देशांमधील औद्योगिक उत्पादन थांबविण्यात आल्याने जागतिक कार्बन उत्सर्जनात घट होत असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे.
भारतासह जगभरातील 100पेक्षा अधिक देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रामुख्याने संपर्कातून फैलावणाऱ्या या रोगामुळे जगभरात काही हजार नागरिक मृत्युमुखी पडले असून, लाखो लोकांना या रोगाची लागण झाली आहे. या विषाणूमुळे निर्माण होणारा धोका पाहता, याचे संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश देशांनी आपल्याकडील विमानसेवा रद्द केली आहे. तसेच, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनावर निर्बंध लादले आहेत.
एका जागतिक संस्थेच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्चदरम्यान सुमारे 4 टक्के आंतरराष्ट्रीय वाहतूक रद्द केली आहे. परिणामी, हवाई वाहतुकीमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर यामुळे चांगलाच परिणाम झाला आहे. या उत्सर्जनात सातत्याने घट होत असून, हीच परिस्थिती कायम राहिल्यास जगतिक कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या विषाणू प्रादूर्भावाचा मुख्य केंद्र असलेल्या चीनमध्ये तसेच अन्य काही राष्ट्रांनी आपल्याकडील औद्योगिक कामकाजावरही निर्बंध लादले आहेत. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्येही चीनसहित बहुतांश देशांवरील वातावरणीय घटकात नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड यासारख्या प्रदूषक घटकांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक कार्बन उत्सर्जन
36,573 मेट्रिक टन प्रतिवष
भारतातील कार्बन उत्सर्जन
2654 मेट्रिक टन प्रतिवष
या गोष्टींचा होतोय फायदा
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज
चर्चासत्रे, कार्यक्रम रद्द
अंतर्गत वाहतुकीवर निर्बंध
औद्योगिक निर्बंध