बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी वुहान शहरात नाही तर हार्बिन शहराला कोरोनाने आपले केंद्र बनवले आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 1 हजार 240 किलोमीटर दूर असलेले हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
हार्बिन हे चीनमधील हेलॉन्गजियांग प्रांताची राजधानी आहे. येथील लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. 53 हजार 523 वर्ग किलोमीटर परिसरात वसलेल्या या मोठ्या शहरात 131 जिल्हे, 107 तालुके, 62 टाऊनशिप आणि 1 हजार 879 गावे आहेत. आकाराने हार्बिन भारताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दिल्लीहून 36 पटिंनी मोठे आहे. या शहरात 70 रूग्ण समोर आल्यानंतर चीन शहर लॉकडाऊन केले आहे.
हार्बिनमध्ये ज्या 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांवर नजर ठेवण्यात येत आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी शेकडो लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हार्बिनमध्ये फक्त त्याच लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी कोरोना ऍप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले आहे आणि ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, हार्बिनमध्ये कोरोना पसरण्यामागील सर्वात मोठे कारण न्यूयॉर्कमधून परतलेला एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणि आजूबाजूच्या 4 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यावेळी त्यातील 70 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.