पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या आणखी एका रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बारा रुग्णांपैकी दहा रुग्ण ठणठणीत बरे होत घरी गेले आहेत. तर दोन रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हा रुग्ण अमेरिकेतून शहरात आला होता. त्याला 17 मार्च रोजी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचे चौदा दिवसाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात 12 मार्च रोजी पहिले तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर शहरातील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पिंपरी चिंचवड शहराकडे लागले होते.
मात्र त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभावी उपाययोजना करत करोना या आजाराला रोखण्यात यश मिळवले आहे. गुरुवारी (दि. 26) पहिल्या तीन करोनाबाधित रुग्णांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर शुक्रवारी (दि. 27) त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. पुढच्या सहा रुग्णांचेही उपाचारानंतरचे चौदा दिवसांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले. त्यानंतर मंगळवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. आता दोन करोनाबाधित रुग्ण असून त्यांचीही चाचणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.