पुणे – मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील गुढीपाडव्यावर परिणाम झाला आहे. सणाच्या पूर्वीच बाजारपेठा सजतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. त्यामुळे अनेकांकडून तयार गुढ्या आणि गुढीवस्त्राला प्राधान्य देण्यात आहे.
नववर्षाच्या स्वागताला गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. साधारण आठवडाभर बाजारपेठा सजलेल्या असतात. मात्र, करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पाडव्याच्या सणावर परिणाम झाला आहे. याशिवाय, सध्या करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक बाजारपेठांमध्ये जाणे टाळत आहेत. त्यामुळे घरपोच मिळणाऱ्या गुढ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
पूर्वी घराच्या अंगणात उंच गुढी उभी करण्याची प्रथा होती. मात्र, सध्याच्या फ्लॅट संस्कृतीमुळे गुढीचा आकार लहान होत आहे. अनेकजण खिडक्या आणि गॅलरीत गुढ्या उभारतात. यासाठी लागणारे बांबू, गुढी वस्त्र, गाठी, हार, कडूलिंबाची पाने आदींचे अनेक प्रकार बाजारपेठांमध्ये दिसतात. मात्र, करोनामुळे गुढीचे साहित्य अल्पप्रमाणातच दिसत आहे. त्यामुळे यंदा अनेकांनी “मिनीएचर’ गुढ्यांना पसंती दिली आहे.
गुढी वस्त्र, गाठी, हार आदींचा समावेश असणारी गुढी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याशिवाय बांबूपासून कलशापर्यंत सर्व साहित्य असणारे रेडीमेड बॉक्स, मोती, लोकरसह विविध धातूंच्या गुढ्या लक्षवेधी ठरत आहेत. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियासह वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरदेखील “मिनी गुढ्यांना’ प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय खण, पैठणीच्या कापड्याच्या गुढी वस्त्रांची यंदा विशेष चलती आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मिनी गुढ्यांची खरेदी करत आहे. देवापुढे मांडण्यासाठी आणि सजावटीसाठी या गुढ्या खरेदी करण्यात येत असल्याचे विक्रेते सांगतात.