बिजींग – चीन मध्ये करोना विषाणुच्या प्रसाराने कहर केल्यामुळे यावेळी गेल्या दहा वर्षात प्रथमच चिनी संसदेचे वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. चीन मध्ये करोना विषाणुंचा प्रसार अजून थांबलेला नाहीं तसेच या रोगामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 2500 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे संसद अधिवेशनच पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आज नॅशनल पिपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीची बैठक झाली त्यात अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन 5 मार्च पासून सुरू होणार होते. प्रथे नुसार हे अधिवेशन दोन आठवडे चालणार होते. त्यात वार्षिक अर्थसंकल्पासह काहीं नवीन कायद्यांचे प्रस्ताव संमत होणार होते. अधिवेशनाच्या नवीन तारखा मात्र अद्याप निश्चीत करण्यात आलेल्या नाहीत. चीन मध्ये संसदेचे अधिवेशनच पुढे ढकलण्याचा हा प्रकार अगदी दुर्मिळ मानला जातो.