करोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सतर्कता
मेढा (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील निझरे या गावांतील एका रुग्ण करोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली असून परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित रुग्णाच्या कुटुंबासह त्याच्या संपर्कात आलेल्या गावातील व्यक्तीची आरोग्य विभाग तातडीने तपासणी करत आहे. तर जावळी तालुक्यातील आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून संबंधित व्यक्तीच्या आणखी किती जण संपर्कात आहेत, याचा शोध सुरु झाला आहे.
निझरे येथे मुंबईहून आलेल्या एका ५४ वर्षीय टँक्सीचालकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण दहा दिवसांपूर्वी मुंबईहून निझरे येथे आला. जावळी तालुक्यातील पहिलाच रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. तर शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग यांनी तातडीने निझरे गावातील संबंधत कुटुंब व संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी सुरु केली आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह व तहसीलदार शरद पाटील यांनी तातडीने निझरे येथे जाऊन संपूर्ण गाव शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे .
संबंधित रुग्णाचा मेढा बाजारपेठेत ही वावर …..
निझरे येथील या रुग्णाचा मेढा बाजार पेठेतही वावर झाल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित करोना बाधित काही खासगी डॉक्टर व किराणामाल दुकानदारांच्या संपर्कात आला होता. त्या पद्धतीने चौकशी करून दुकानदार आणि डॉक्टर यांनाही प्रशासनातर्फे होम क्वारंटाईनचे आदेश दिले आहेत.