नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर हे कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर सध्या गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित एजन्सीच्या संचालकास बोलावून खडे बोल सुनावले आहेत. याबाबत आमदार कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली असून संबंधित एजन्सीचा करार रद्द करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दिवस-रात्र एक करून डॉक्टर्स रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असताना निकृष्ट दर्जाचे अन्न मात्र एजन्सीकडून रुग्णांना दिले जात आहे. आमदार कल्याणकर हे मागील सात दिवसांपासून गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांनी आमदार कल्याणकर यांच्याकडे जेवणाबाबत तक्रारी केल्या होत्या.
आमदार कल्याणकर यांनी स्वतः शहानिशा करून संबंधित एजन्सीच्या संचालकास बोलावून घेतले. सकाळी 8 वाजता रुग्णांना द्यायचा नाष्टा एजन्सीकडून रुग्णांना 10 वाजता दिला जात आहे. तसेच जेवणाचा देखील वेळ पाळत नसल्याचे समोर आले आहे. जेवण हे एका कॅरीबॅगमध्ये देत असल्याची गंभीर बाब देखील समोर आली आहे.
हा सर्व धक्कादायक प्रकार आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी विपीन इटणकर तसेच अधिष्ठाता निळकंठ भोसीकर यांच्या कानावर घातला आहे. याबाबत अधिष्ठाता नीळकंठ भोसीकर यांनी देखील या एजन्सीवर तात्काळ कारवाई केल्याचे आमदार कल्याणकर यांना सांगितले.