मुंबई : कोरोनाने आता मुंबई पोलिसांमध्ये प्रवेश केला आहे. कारण आता मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या ३४ वर्षीय सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर भायखळा पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत भायखळ्याच्या पोलिस वसाहतीमध्ये कोरोनाबाधित पोलिस अधिकारी ज्या इमारतीमध्ये राहतात ती सील करण्यात आली आहे. वसाहतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी केली जात आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच, कोरोनाबाधित पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती झोन ४ चे पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली. तसेच पोलिस वसाहतीतील त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.