मुंबई – महाराष्ट्रात सध्या करोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असतानाच याच दरम्यान एक दिलासादायक बातमी आली आहे. मुंबईतील चेंबूरमधल्या पाच दिवसांच्या बाळासह त्याच्या आईचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान दोन दिवसापूर्वी या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यावेळी तो फक्त तीन दिवसाचा आणि करोनाची लागण झालेला सर्वात कमी वयाचा मुलगा होता. आता त्याची पुन्हा तपासणी केल्यानंतर पाच दिवसांच्या बाळासह त्याच्या आईचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सध्या महिलेला आणि तिच्या बाळाला कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्यांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. रूग्णलयाच्या माहितीनुसार शुक्रवारी आज पुन्हा एकदा बाळाची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. या महिलेच्या पतीला सुध्दा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण….
चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात तीन दिवसाच्या बाळासह आईला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही लागण कोणामुळे झाली हे स्पष्ट झालं नव्हतं. या रुग्णालयात एक व्यक्ती अॅडमिट होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर तिथून त्याला हलवण्यात आलं. मात्र, या रुग्णलयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करताच प्रसुती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या महिलेला सिझेरियनद्वारे बाळ देखील झाले आणि त्या दरम्यानच त्या महिलेस बाळाला कोरोनाची लागण झाली असा आरोप महिलेच्या पतीनं केला होता.
ते खाजगी रूग्णालय केले सील..
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने सध्या संबंधित खाजगी रूग्णालयास सील केले आहे. ज्या ठिकाणाहून बाळाला करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.