नवी दिल्ली – कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी रुग्णालये अंकित करावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे. कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर, सुनावणी झाली.
देशात अनेक खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या रुग्णालयांनी कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली जात असल्याचे, या याचिकेत म्हटले आहे.
शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारने करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.