पुणे: पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुस-या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही.
50 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला असलेले दांपत्य 24 फेब्रुवारीला दुबई येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर 1 मार्चला ते पुण्यात परतले. त्यातील एका रुग्णाला करोना सदृश लक्षणे दिसल्याने नायडू रुगणालायत उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटूंबातील दोघांनाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नायडू रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. हे दांपत्य सिंहगड रस्ता परिसरातील असल्याची प्राथमिक आहे.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगांव भरणा-या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.