पुणे – करोना उपचारांसाठी जम्बो रुग्णालयामुळे अनेक रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील नवीन इमारतीत उपचार घेणाऱ्या करोनाच्या ऑक्सिजनवरील 250 ते 300 बाधितांना आता जम्बो रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. येथे रुग्णांना होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा वेग कमी-अधिक होत असतो. या प्लॅंटमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना काळात ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत “कोविड रुग्णालय’ उभारण्यात आले. अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी इमारत परिसरात तातडीने ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक अडथळा आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ससूनच्या नव्या इमारतीतील रुगणलायत 120 बेड व्हेंटिलेटरची, सुमारे 350 बेडस ऑक्सिजनची सुविधा असून, अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढत आहे. त्यांना “हाय फ्लो नेझल ऑक्सिजन’ या अद्ययावत ऑक्सिजन पुरवठा तंत्रासह ऑक्सिजन सिलिंडरद्वारे पुरवठा करण्यात येत आहे. मास्क लावून ऑक्सिजन पुरवठा करताना एक व्यक्तीला एक मिनिटांसाठी 6 ते 15 लिटर, व्हेंटिलेटरद्वारे 30 ते 40 लिटर आणि हाय फ्लो तंत्रज्ञान वापरून एका मिनिटाला 60 ते 70 लिटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
पुरवठा करताना कमी जास्त वेगाने ऑक्सिजन येत असल्याने त्यावेळी पाच मिनिटांसाठी बॅकअपसाठी ठेवलेल्या सिलिंडरद्वारे पुरवठा होतो. नंतर पुन्हा पूर्ववत पुरवठा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये आणखी काही बदल करावे लागतील. त्यासाठी तात्पुरता स्वरूपात प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ससून रुग्णालय प्रशासन अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.