एकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
पुणे(प्रतिनिधी) – करोना बाधीत रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोंढवा येथील सिंहगड गर्ल्स हॉस्टेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये सोमवारी सकाळी घडली. दरम्यान या घटनेनंतर दुसऱ्या एका रुग्णाचा अर्ध्या तासातच मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू हार्ट ऍटॅकने झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुंडाप्पा शरणाप्पा शेवरे(55, अप्पर इंदिरानगर) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार गुंडाप्पाला 4 जुलै रोजी पॉझिटीव्ह आढळ्यावर क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. त्याचा मुलगाही पॉझिटीव्ह असल्याने तोही त्यांच्या सोबत दाखल झाला होता. ते दोघे आणि आणखी दोन रुग्ण असे चौघे जण एका खोलीत उपचार घेत होते.
सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा व इतर दोन रुग्ण नाष्टा करण्यासाठी गेले. यावेळी गुंडाप्पा यांनी आतून दार लावून घेतले. त्यांना कपडे अडकावयच्या हुकाला पांढऱ्या दुप्पट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा व इतर रुग्ण परत आल्यावर त्यांना खोलीचा दरवाचा बंद दिसला. त्यांनी तो ढकलून उघडला असता, गुंडाप्पा गळफास घेतलेल्या अवस्थे दिसले. गुंडाप्पा यांना मागील दोन दिवसांपासून खोकल्याचा त्रास वाढला होता. यामुळे ते थोडे त्रस्त होते. यातूनच त्यांनी गळफास घेतल्याची शक्यता आहे.
दरम्यान, याच क्वारंटाईन सेंटरमधील एका करोना रुग्णाचा आत्महत्येच्या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात मृत्यू झाला. त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.