नागपूर – राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील रुग्णालये भरली असून बेड मिळविण्यासाठी रुग्णांना धडपड करावी लागत आहे. त्यातच करोना रुग्णांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात काही तासाच्या फरकाने दोन करोना बाधित वृद्धांनी आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
नागपूरमधील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय रुग्णलयातील कोविड वॉर्डमध्ये पुरुषोत्तम गजभिये (वय८१) यांनी आत्महत्या केली आहे. कोविड वॉर्डमधील बाथरुममध्ये गळफास घेऊन गजभिये यांनी आपलं जीवन संपवलं. गडभिये यांना २६ मार्च रोजी करोनाची बाधा झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यापासून कुटुंबीयातील कोणीही रुग्णालयाकडे फिरकले नाही. या नैराश्यातूनच पुरुषोत्तम यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
दुसरी घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत पंच्याशी प्लॉट परिसरात घडली. वसंतराव कुटे या 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कुटे यांना 26 मार्च रोजी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आजारपणातील नैराश्यामुळंच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.