नवी दिल्ली : औरंगाबादमधील पोलिसांना मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. इंदूर शहराच्या चंदननगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इंदूर पोलीस चंदननगर भागात गस्त घालत असताना काही नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. परिसरातील नागरिकांनी घरातच बसावे, असं सांगत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात एका कोरोनाबाधिताचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. हल्ला करणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली असून, अद्यापही काही तरुण फरार आहेत.
दरम्यान, इंदूर शहरातील तातपत्ती बाखल परिसरामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या चार जणांवर इंदूर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई केली आहे. आरोग्य विभागाचे ५ जणांचे पथक बुधवारी तातपत्ती बाखल परिसरात रुग्णाच्या नातेवाईकाला विलगीकरण करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. त्यात दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या होत्या. या हल्ल्या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. त्यापैकी चार जणांवर प्रशासनाने एनएसएअन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर शुक्रवारी सकाळी आणखी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.