पुरी – पुरी येथील श्री भगवान जगन्नाथ देवालयातील किमान 351 सेवेकरी आणि 53 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. देवालयातील एकूण 404 जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक अजय जेना यांनी मंगळवारी सांगितले. इतके सेवेकरी बाधित होऊनही भगवान जगन्नाथाच्या नित्य सेवा आणि कर्म नियमित सुरू आहेत.
करोनाची बाधा झालेले बहुतांश सेवेकरी घरीच विलगीकरणात आहेत. त्यामुळे नित्य कर्माची यथोचित माहिती असणाऱ्या सेवेकऱ्यांची कमतरता जाणवत आहे. भगवान बालभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथांच्या नित्य कर्मासाठी प्रत्येकी 13 पुजाऱ्यांच्या गटाची आवश्यकता असते. त्यामूळे भगवान विष्णूच्या या सर्वात पुरातन मंदिरात सेवेकऱ्यांधील 39 पुजारी नियमित उपस्थित असावे असतात.
या तीनही देवांची नित्यकर्मे ही एकमेकांशी संबंधित असतात. ति भल्या पहाटेसुरू होतात आणि रात्री उशीरापर्यंत चालतात. मंदिराच्या परंपरेप्रमाणे जर एक कर्म करायचे राहिले तर त्यापुढील दुसरा विधी करता येत नाही. म्हणून प्रशासन कनिष्ठ सेवेकऱ्यांना संधी देण्याचा विचार करत आहे.
पुरी जिल्ह्यात एकून नऊ हजार 704 करोना बाधित असून त्यात पुरी शहरातच एक हजार 255 बाधित आहेत. तर 52 जण मरण पावले आहेत. त्यात तीन सेवेकऱ्यांचा समावेश आहे. जगन्नाथाच्या रथयात्रेवेळी जिल्हा प्रशासनाने सर्व सेवेकऱ्यांची चाचणी केली होती.
त्यात केवळ दोन जण पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र त्यानंतर महिनाभरात संसर्ग वेगाने वाढला. सेवेकऱ्यांच्या कुटुंबियांना संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून त्यांना होमिओपॅथिक औषधे देण्यात आली आहेत.
येत्या काही दिवसांत आणखी सेवेकरी करोना बाधित झाल्यास मंदिराच्या परंपरेप्रमाणे नित्यकर्म करता येणार नाहीत, असे जगन्नाथ संस्कृतीचे गाढे अभ्यासक भअस्कर मिश्रा यांनी सांगितले.