पुणे – शहरात दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन करोना बाधितांचा दर 2.4 टक्के नोंदवला गेला आहे. मागील दोन आठवड्यांत रुग्णसंख्या वाढती नोंदविली गेल्याने, महापालिकेने करोना चाचण्यांची संख्याही वाढविली होती. मात्र, या चाचण्या वाढविण्यात आल्यानंतरही हा बाधितांच दर घटत असल्याचे समोर आले आहे.
शनिवारी शहरात 181 नवे करोना बाधित रूग्ण आढळून आले असून 331 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर करोनाने आठ जणांचा मृत्यु झाला असून त्यातील पाच शहरातील तर 3 जण शहराच्या हद्दीबाहेरील आहेत. एप्रिलमध्ये शहरात दिवसाला करोनाच्या 25 ते 27 हजार चाचण्या होत होत्या, तर शहराचा दैनंदिन बाधितदरही तब्बल 27 टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर मे आणि जूनमध्ये हा दर कमालीचा घसण्यास सुरूवात झाली होती.
तर 8 जूननंतर हा दर 7 ते 4 टक्क्यांदरम्यान राहिला होता. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाधितांचा दर पुन्हा 5 टक्क्यांवर जाऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून करोना चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवत ती 4 हजारांवरून सात ते आठ हजार करण्यात आली.
त्यानंतर जवळपास आठवडाभर शहरात रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसात पुन्हा रूग्णसंख्येचा वाढता आलेख घसरला असून शनिवारी तर नवीन दैनंदिन बाधितांचा दर अवघा 2.4 टक्के नोंदविला गेला आहे, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.