नवी दिल्ली: जगात करोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. करोनाचा धोका अजूनही तसाच आहे. त्यातच आता यूकेमध्ये आणखी एका नव्या विषाणूजन्य आजाराची नोंद करण्यात आली आहे. युकेमध्ये नव्या ‘नॉरोव्हायरस’चे अनेक रुग्ण समोर येताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आता आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, आतापर्यंत नॉरोव्हायरसचे १५४ रुग्ण आढळले आहेत. याविषयी अधिकची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे. “नॉरोव्हायरस हा एक अत्यंत सांसर्गिक विषाणू आहे. यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार असे त्रास उद्भवतात. या रोगाचा प्रसार फिकल-ओरल रूटमार्फत होतो. म्हणजेच, एखाद्याला दूषित अन्न, पाणी किंवा आतड्यांसंबंधी हालचाली झाल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो.
“हा व्हायरस पृष्ठभागावरही राहू शकतो. जर आपण हाताची स्वच्छता योग्य प्रकारे राखली नाही तर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.” विशेषत: पावसाळ्यात नॉरोव्हायरस चिंताजनक आहे. कारण पावसाळ्यात आपल्या घरातील पाण्याची गुणवत्ता फारशी चांगली असत नाही. “जर पाणी दूषित असेल तर त्याचा परिणाम घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याचसोबत जर नॉरोव्हायरसची लागण झालेली एखादी व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर त्यामुळे इतरांनाही त्याची लागण होऊ शकते.”
फिकल-ओरल रूट म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी ‘पाच एफ’ म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं. फिंगर्स (बोटं), माशी (फ्लाईज), फिल्ड्स, फ्लूड (द्रवपदार्थ) आणि फूड (अन्न) यांमार्फत (मल कणांमार्फत) होणा-या संसर्गामुळे साधारणतः अतिसार, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ आणि हिपॅटायटीससारखे रोग होतात. ह्याच मार्गाने नॉरोव्हायरसचा संसर्ग होतो. त्यामुळे स्वच्छता सर्वात महत्त्वाची आणि प्राधान्य क्रमवार असायला हवी.
“ह्यात अँटिबायोटिक्स कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत. ह्यात प्रामुख्याने आपल्या हायड्रेटेड ठेवणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठी, ओआरएस अत्यंत उपयुक्त ठरेल. व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस प्रकारचा आजार ५ ते ६ दिवस टिकतो किंवा काही वेळा जास्त काळासाठी देखील असू शकतो. डिहायड्रेशन रोखणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”याचसोबत, नॉरोव्हायरसचा संसर्ग रोखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे योग्य त्या प्रमाणात स्वच्छता राखणं.