करोनाने पुन्हा डोके वर काढले; नगरमध्ये तीनशे पॉझिटिव्ह

चाचण्या वाढविण्यावर भर; महापालिकेचे दोन करोना सेंटर सुरू होणार

नगर (प्रतिनिधी) – शहरात गेल्या आठ दिवसांपासून करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आतापर्यंत शहरात तीनशे जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने धास्ती घेतली आहे. महापालिकेने चाचण्या वाढविण्यावर भर दिला असून, शहरात लवकरच दोन करोना सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रात स्वॅब तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार लक्षणे आढळलेले रूग्ण तपासणीसाठी येत आहेत. तसेच, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तसेच रुग्णांना अतिरिक्त बेडची व्यवस्था व्हावी, यासाठी नटराज कोविड सेंटर व जैन पितळे बोर्डिंग येथेही सेंटर सुरू होत आहे. पालिकेच्या ताब्यात शासकीय तंत्रनिकेत, आनंद लॉन, जिल्हा रुग्णालयाचे नर्सिंग कॉलेजचेही केंद्र गरज पडल्यास सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये सुमारे तीनशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, दररोज सरासरी 35 ते 40 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने उपाययोजनांसाठी धावपळ सुरू केली आहे.

जिल्ह्यात 176 नवे रुग्ण

जिल्ह्यात आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार नवीन 176 नवे रुग्ण आढळून आले असून, उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 898 वर जाऊन पोचली आहे. तर, बरे झाल्याने 174 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

महापालिका आपल्या परीने उपाययोजना करीत आहेत. पण, नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. वारंवार हात साबनाने स्वच्छ करा, मास्कचा वापर करा. मी जबाबदार मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे.
अनिल बोरगे, आरोग्याधिकारी महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.