#corona news | वाढत्या लॉकडाऊनचा व्यावसायिकांना फटका; व्यवहारांवर संक्रात

– नीलकंठ मोहिते

रेडा -करोनामुळे इंदापूर शहरासह तालुक्‍यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये ठराविक यावेळेस नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजेच्या जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली होती.

तर वैद्यकीय सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन संपत नाही तोच आणखी 15 जूनपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.

आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सूट देण्यात आली. मात्र सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहेत.

इंदापूर शहरासह तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांनी राष्ट्रीय बॅंकांकडून लाखोंचे कर्ज घेऊन आपले उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये भाडेतत्वावर महागड्या व्यापारी संकुलातील दुकाने घेऊन, त्यामध्ये लाखो रुपयांचा माल खरेदी करून विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवला आहे.

मात्र वाढत्या लॉकडाऊनमुळे मालाची विक्री थांबली आहे. व्यापाऱ्यांना बॅंकेच्या दर महिन्याच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या नागरिकांनी दुकाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्याचे भाडेसुद्धा भरणे मुश्‍कील झाले आहे.

यासाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्‍न व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे कपडा व्यापार यासह इतर उद्योग करणाऱ्यांमध्ये दररोज होत असलेला व्यवहार थांबल्यामुळे सर्व घटकाला लॉकडाऊनची झळ बसली आहे.

इंदापूर शहरातील विविध उद्योगांवर संक्रांत आली आहे.एवढेच नाही तर जीवनावश्‍यक गरजेच्या वस्तू विकणाऱ्या किराणा व्यावसायिकांनासुद्धा जेमतेम कमी वेळ देण्यात आल्यामुळे विक्री होत नाही.

शेतकऱ्यांकडे मागील कर्ज थकीत असल्यामुळे, शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन आणि इतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध व्हावे याकरिता कृषी सेवा केंद्र खुले ठेवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना हमीयुक्‍त बियाणे मिळावे, यासाठी प्रशासनाकडून तालुका कृषी अधिकारी तसेच इतर प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

वेळेत पीककर्ज उपलब्ध करणे गरजेचे
सद्यस्थितीत शेतकऱ्यांमध्ये पेरणीची आणि शेतीच्या मशागतीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

मात्र दरवर्षी मिळणाऱ्या राष्ट्रीय बॅंकांकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट होत आहे. अर्धे अधिक शेतकरी अवैध सावकारीच्या विळख्यात अडकण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून दिल्यास अवैध सावकारीच्या विळख्यातून त्याची मुक्‍तता होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.