काळजी घ्या! देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण

नवी दिल्ली – देशातील करोना बाधितांच्या संख्येमध्ये आज मोठी वाढ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ४३,६५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी तब्बल ४ महिन्यांनंतर २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या बाधितांचा आकडा प्रथमच ३० हजारांच्या आत आला होता. मात्र आज (बुधवारी) उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णसंख्या मंगळवारच्या रुग्णसंख्येपेक्षा ४७ टक्क्यांनी अधिक आहे. 

देशाचा पोझीटीव्हीव्हीटी दर २.५१ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६४० मृत्यू झाले असून देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ४.२२ लाखांवर पोहचला आहे.

आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देशातील करोना रुग्ण घटण्याची गती मंदावल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. “करोना महासाथीचा अंत अजून दूर आहे. आपल्याला सतर्क राहावं लागेल. आपण विषाणूला कंटाळलो असलो तरी विषाणू मात्र कंटाळलेला नाही. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.” असं लसीकरण तज्ज्ञ समितीचे प्रमुख व्ही के पॉल यांनी म्हंटलं.

देशातील २२ जिल्हांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील ७ जिल्हे केरळ, ५ मणिपूर व ३ जिल्हे मेघालय येथील आहेत, अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये आढळून आलेल्या ४३,६५४ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळ येथे सापडले आहेत. केरळ येथे गेल्या २४ तासांमध्ये २२,१२९ रुग्ण आढळले. केरळ, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये देशात सापडणाऱ्या एकूण करोना रुग्णांच्या ५० टक्के रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ६,२५८ तर कर्नाटकात १,५०१ रुग्ण आढळून आले. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.