करोना मास्कचाही पर्यावरणावर पडणार बोजा

नवी दिल्ली – करोनाचा सगळ्याच आघाड्यांवर त्रास झाला आहे. एकीकडे या आजाराने लोकांना रूग्णालयांची वारी घडवली. काहींना परतीचा प्रवास करायला लावला. अर्थचक्र ठप्प केले. त्यातच त्याच्यापासून बचावासाठी वापरला जाणारा मास्कही तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण म्हणजे या मास्कमुळे सागराची इकोसिस्टिम प्रचंड प्रभावित होणार असल्याची भीती नुकतीच एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

हॉंगकॉंगची पर्यावरण संस्था ओशियन्स एशियाने या संदर्भात हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जगभरात विविध ठिकाणी वापरले गेलेले मास्क वेगवेगळ्या स्त्रोतांतून अखेर समुद्रातच जाऊन पडणार आहेत. त्याद्वारे हजारो टन प्लॅस्टिक सागराच्या पाण्यात मिसळणार असून त्याचा अगोदरच प्रदूषित झालेल्या या पाण्यावर ताण पडणार असून सागरी जिवसृष्टीवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

एका अनुमानानुसार करोना विषाणूपासून बचावासाठी या वर्षी अंदाजे 5200 कोटी मास्कची निर्मिती झाली आहे. परंपरागत गणनेच्या आधारावर यातील तीन टक्के भाग हा शेवटी समुद्राच्या पाण्यातच जाऊन मिळणार आहे. हे सिंगल यूज फेस्क मास्क मेल्टब्लॉन या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनवलेले असतात. त्याची बनावट, धोका आणि संसर्गाच्या भीतीमुळे त्यांचे रिसायकल करणे अवघड आणि अयोग्यही असते.

एका मास्कचे वजन तीन ते चार ग्रॅम असते. या हिशेबाने जवळपास 6800 टनच्या आसपास प्लॅस्टिक प्रदूषण होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी जवळजवळ 450 वर्षे लागतील. त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी पुन्हा वापरता येईल अशाच मास्कचा वापर केला जावा असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.