हॉलिवूडची पॉप गायिका मॅडोनाला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तिच्या तपासणीमध्ये तिच्या शरीरात करोनाच्या विरोधातील ऍन्टीबॉडीज निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. ही स्थिती संसर्ग झाल्यासच निर्माण होते. “क्वारंटाईन डायरी’च्या 14 व्या एडिशनमध्ये तिने स्वतःच ही बाब शेअर केली आहे. त्यानंतर योग्य उपचार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असतानाही मॅडोनाने हे सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी मॅडोना सेलिब्रिटी फोटोग्राफर स्टीवन क्लीनच्या बर्थडे पार्टीमध्ये मस्त धमाल करताना आढळली होती. तिने तर स्टीवन क्लीनला एक करोना केकही भेट म्हणून दिला आहे, असेही तिच्या मॅनेजरने म्हटले आहे. तिने तिथे मास्क तर लावला नव्हताच. त्याशिवाय तिने फॅन्सपासून अंतरही राखून ठेवले नव्हते.
करोनाची लागण होण्यापूर्वी अनेक दिवस ती होम क्वारंटाईनमध्ये होती. आता टेस्टचा रिझल्ट आल्यावर काळजी घेण्याऐवजी मॅडोनाने अधिकाधिक निष्काळजीपणे वागायला सुरुवात केली आहे. “आता मी करोनाच्या हवेतच श्वास घेते आहे. मी लॉंग ड्राईव्हवर जाणार आहे. आता घरात अजिबात बसून राहणार नाही.’ अशी पहिली प्रतिक्रिया तिने दिली होती.