Corona : 1 ते 20 वर्षे वयोगटातील बाधितांचे प्रमाण 12 टक्‍क्‍यांपेक्षा कमी

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेत बालके आणि युवक बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याची चर्चा केंद्र सरकारने खोडून काढली आहे. करोनाच्या दोन्ही लाटांमधील 1 ते 20 वर्षे वयोगटातील बाधितांचे प्रमाण 12 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याची आकडेवारी सरकारने सादर केली आहे.

करोनाची पहिली लाट मागील वर्षी आली. त्या लाटेत 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत बाधित झालेल्यांमध्ये 1 ते 20 वर्षे वयोगटातील बाधितांचे प्रमाण 11.31 टक्के इतके नोंदले गेले. तर, चालू वर्षीच्या दुसऱ्या लाटेत (15 मार्च ते 25 मे) संबंधित वयोगटातील बाधितांचा वाटा 11.62 टक्के इतका राहिला. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये बाधितांचे अधिक प्रमाण 21 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिकांचे होते.

पहिल्या लाटेत ते 59.74 टक्के, तर दुसऱ्या लाटेत 62.45 टक्के ठरले. पहिल्या लाटेत 61 वर्षांवरील 13.89 टक्के नागरिकांना करोना संसर्ग झाला. तर, दुसऱ्या लाटेत ते प्रमाण 12.58 टक्के इतके नोंदले गेले.

पहिल्या लाटेत 1 ते 10 वर्षे वयाची 3.28 टक्के, तर दुसऱ्या लाटेत त्या वयोगटातील 3.05 टक्के बालके करोनाबाधित झाली. ते प्रमाण 11 ते 20 वर्षे वयोगटासाठी अनुक्रमे 8.03 टक्के आणि 8.57 टक्के इतके होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.