मंचर : गिरवली (ता. आंबेगाव) येथील तीन व्यक्तींचा कोरोनाअहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर नारोडी येथील 64 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला आहे. ते पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बाधितांची संख्या 42 झाली आहे. यातील 10 रुग्ण बरे झाले असुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यावर मंचर व पुणे येथील रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गिरवली येथील तीन व्यक्ती 20 ते 50 वयोगटातील असुन यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहेत. या व्यक्ती मुंबईहून आलेल्या आहेत. त्यामुळे करोना बाधित व्यक्तींची संख्या 42 झाली आहे. यामध्ये गिरवली गावातील सहा करोना बाधित व्यक्ती आहेत.
तालुक्यातील करोना बाधित व्यक्तीमधील 10 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वळती, जवळे, साकोरे, घोडेगाव, पिंगळवाडी (लांडेवाडी) व गिरवली प्रत्येकी एक व शिनोलीतील चार असे या गावातील व्यक्तीना घरी सोडले आहे. तालुक्यातील 16 गावे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या व येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेत स्वतः क्वारंटाइन व्हावे, प्रशासनाला माहिती द्यावी, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे, लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे.