करोनाने घेतला आणखी चार पोलिसांचा बळी

मुंबई : राज्यात करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात करोना योद्ध्यांपैकी एक असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा विळखा बसला आहे. कारण, मागील चोवीस तासांत करोनामुळे चार पोलिसांना जीव गमावावा लागला असून, आणखी ३० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता ५ हजार २०५ वर पोहचली आहे. सध्या १ हजार ७० पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ४ हजार ७१ पोलिसांनी करोनावर मात केली असल्याचे वृत्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.


करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.