करोना ‘काळ’वर्ष : “लालपरी’ला मिळाली आर्थिक बळकटी

प्रवासी सेवेची तूट भरून काढण्यासाठी मालवाहतुकीवर भर

पुणे –खेड्यापाड्यात सेवा देणाऱ्या “लालपरी’ला करोनामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. 22 मार्चनंतर एसटीची प्रवासी सेवा स्थगित झाली. यानंतर एसटीने उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी मालवाहतुकीवर भर दिला. याशिवाय, करोनामुळे पहिल्यांदाच पायी वारीऐवजी “एसटीतून वारी’ पार पडली.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले. त्यामुळे लहान खेड्यात पोहोचलेली लालपरीची सेवा ठप्प झाली. यादरम्यान मजूरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याची भूमिका एसटीने पेलली. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर मालवाहतूकदेखील केली. 23 मे पासून मालवाहतुकीसाठी एस.टी.च्या 2800 फेऱ्या झाल्या. यातुन एस.टी.ला सुमार 3 कोटी रूपये उत्पन्न मिळाले. जूनपासून टप्प्याटप्प्याने एसटीची सेवा सुरू झाली. पहिल्या टप्यात प्रवासी संख्येबाबत निर्बंध घातले होते. अनलॉकनंतर आंतरराज्य वाहतुकीला सुरुवात झाली.सध्या बहुतांश मार्गावर एसटीची गाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने प्रवाशांना जोडण्यासाठी एसटी प्रशासनाकडून “टूर’ विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यात महाबळेश्‍वर दर्शन, अष्टविनायक दर्शन, रायगड दर्शन आदीचा समावेश आहे.

पायीऐवजी “एसटी’तून वारी’
करोनामुळे आषाढी पायी वारीत खंड पडला. परंतु, वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडू नये, यासाठी एसटीतून वारीचे नियोजन झाले. यावर्षी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्या सजविलेल्या एसटीतून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.