शांघाय – चीनमधील शांघाय शहरामध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र होऊ लागल्यामुळे आता तेथे पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एका दिवसात तब्बल 4 हजार 477 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.
नागरिकांना केवळ कोविड चाचणी करण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आपल्या घरांच्या आवारातील मोकळ्या बागांमध्ये भटकण्याचीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे शांघाय महापालिकेतील आरोग्य आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शांघायमध्ये दोन टप्प्यात कडक लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तब्बल 25 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघाय शहराचा निम्मा भाग 4 दिवसांसाठी लॉकडाऊन केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित निम्मा भाग देखील लॉकडाऊन केला जाणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण शहराची करोना चाचणी केली जाणार आहे.
यापूर्वी लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आपल्या इमारतीच्या आवारात भटकायची परवानगी असायची. मात्र यावेळी ती परवानगीही नाकारण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा लोकांना फटका बसू नये म्हणून कर सवलत, भाडे वसुलीला मुदतवाढ, भाडे कपात, छोट्या उद्योगांसाठी कर्ज परतफेड सुविधा आदी सवलतीही देण्यात आल्या आहेत.