नवी दिल्ली – देशात पुन्हा करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयातही करोना विषाणूने शिरकाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. याशिवाय, रजिस्ट्री विभागातील सुमारे 150 कर्मचारी देखील पॉझिटिव्ह असून क्वारंटाईनमध्ये आहेत.
अशा प्रकारे, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासह एकूण 32 न्यायाधीशांची क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाचा पॉझिटीव्हीटी रेट 12.5% झाला आहे. यामुळे खटल्यांच्या प्रत्यक्ष सुनावणीवर आठवड्यातून तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश रमणा म्हणाले, आता 4-6 आठवडे प्रत्यक्ष सुनावणी घेणे शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेप्रमाणे, न्यायाधीशांनी त्यांच्या निवासस्थानाच्या कार्यालयातून आभासी सुनावणी घ्यावी, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या निरोप समारंभ मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या एका न्यायाधीशाला ताप होता. यानंतर त्यांची चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
याबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आणि इतर चार वरिष्ठ न्यायाधीशांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, आता न्यायाधीश न्यायालयाऐवजी त्यांच्या निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतील. केवळ तातडीची प्रकरणे, नवीन प्रकरणे, जामीन प्रकरणे, स्थगिती संदर्भातील संबंधित प्रकरणे, अटकेची प्रकरणे आणि निश्चित तारखांच्या प्रकरणांवर 10 जानेवारीपासून सुनावणी केली जाईल.