– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – पुणे शहराबरोबरच उपनगरांत करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता राज्य शासन तसेच महापालिका प्रशासन कार्यरत असताना शहर तसेच उपगरांत समाज उपयोगी उपक्रम राबविणारे नगरसेवकही बाधित होत असल्याचे वस्तुस्थिती समोर आली आहे.
पुणे शहर करोनामुक्त करण्याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ हे सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. याकरिता आरोग्य यंत्रणेसह ठिकठिकाणी ते वैयक्तिक लक्ष ठेऊन होते. यातूनच त्यांना करोनाची बाधा झाली, त्यातून बरे होत ते पुन्हा कार्यरत झाले आहेत.
महापौरांप्रमाणेच शहर, उपनगरांतील प्रभागात त्या-त्या ठिकाणचे नगरसेवक करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. आपापला प्रभाग करोनामुक्त करण्याची जबाबदारी नगरसेवकांवर असल्याने विविध उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच उपनगरांतील अनेक नगरसेवकांनासह त्यांच्या कुठुंबातील सदस्यांनाही करोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. काही जणांनी करोनावर मात केली आहे. काहींचे कुटुंब बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर काही जणांना करोनाच्या या लढ्यात आपले आप्तेष्टही गमवावे लागले आहेत.
पुणे शहराचा दक्षिणेकडील भाग हॉटस्पॉट झाला आहे. या भागातील उपनगरांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. धनकवडी, कात्रज-कोंढवा परिसर भिलारेवाडी, मांगडेवाडी, दत्तनगर, गुजर-निंबाळकर वाडी या दक्षिणकडील भागात रुग्णवाढीचा वेग अधिक आहे.
या भागांतील नगरसेवकांनी करोना काळात अनेक समाजोपयोगी काम केले आहेत. मात्र, काही ठिकाणी स्वत:लाच बाधा झाल्याने त्यांना हे उपक्रम थांबवावे लागले आहेत. बहुतांशी जण कॉरंटाइन झाले आहेत. प्रभाग क्रमांक 38, प्रभाग क्रमांक 40 येथील काही नगरसेवक बाधीत झाले आहेत.
एका लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. यासह या परिसरातील एक सरपंचही करोना बाधीत झाले आहेत. नगरसेवक काही कामं करीत नाहीत, अशी टीका करणाऱ्यांपुढे ही वस्तुस्थिती आल्याने टीकाकार गप्प झाले आहेत.