शिरूर -करोनाच्या संकटामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा उघडण्याबाबत शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्याचा आदेशही शासनाने दिला आहे.
त्यानुसार शिरूर तालुक्यातील दोन हजार शंभर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना तपासणी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली.
दररोज 50 शिक्षकांची करोना तपासणी करता येत असल्याने आणि विविध शाळेतील शिक्षकांची चाचणी वेळेत होण्यासाठी मुख्याध्यापक मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली करोना तपासणी पूर्ण करण्याचे काम सहजपणे आणि विनातक्रार करण्यात यश आले आहे, असे तालुका आरोग्य विस्तार अधिकारी प्रकाश आव्हाड यांनी सांगितले.
तालुका शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. याकामी डॉ. चेतन तुमळे (यवत), डॉ. मयूर नरवडे, पर्यवेक्षक सुनीता जगदाळे, जीजा आहिरे यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी याबद्दल आरोग्यविभाग आणि नोडल ऑफिसर मारुती कदम यांचे अभिनंदन केले.