वाल्हे : जेऊर-मांडकी (ता. पुरंदर) या बागायती क्षेत्रांतीतील गावांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून गाव कोरोनामुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र, बुधवारी (दि. 29) मांडकी तर गुरुवारी (दि. 30) जेऊर या गावांमध्ये करोनाचे रूग्ण सापडले. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जेऊर येथील एका ज्येष्ठ नागरिकास सासवड येथील खासगी रूग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेत आहे. बुधवारी त्यांचे करोना चाचणीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.
जेऊर गावातील पहिला कोरोनारूग्ण आढळल्याने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच स्वच्छतेच्या आणि गावातील रूग्ण सर्वेक्षणाच्या सुचना आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला देण्यात आल्या. जेऊर गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून, जेऊर गावच्या हद्दीत येण्यास अथवा बाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचात कर्मचारी यांच्या माध्यमातून गावाचे सर्वेक्षण करून संबंधित रूग्णाच्या जवळच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच प्रतिक धुमाळ यांनी सांगितले.