पुणे – जनता वसाहतीपाठोपाठ आता सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहतीतही करोनाने शिरकाव केला आहे. या भागात मागील दोन दिवसांत आठ रुग्ण सापडले आहेत. हा परिसरही दाट लोकवस्तीचा असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील आणखी एका झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केला असून, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
सुमारे 1 हजार घरे असलेली पानमळा वसाहत असून, येथे अत्यंत दाटीवाटीने घरे आहेत. पर्वती दर्शन येथे आपल्या मित्राकडे गेलेल्या एका तरुणास करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात, सात जणांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या भागातील पहिला बाधित युवक आपल्या घराजवळच्या एका किराणा व्यावसायिकाच्या संपर्कात आला असून, या दुकानदाराने आपण सुमारे दीडशे जणांच्या संपर्कात आल्याचे आरोग्य विभागाला सांगितले आहे. त्यामुळे या भागात कसून चौकशी करण्यात येत आहे.