म्हसवड (प्रतिनिधी)- माण तालुक्यात बुधवारी पाच करोना पॉंझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यात म्हसवड शहर हद्दीतील एक पॉंझिटिव्ह रूग्ण सापडल्याने म्हसवडमध्ये करोनाने खाते खोलल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. माण तालुक्यातील पाच जणांचे करोना रिपोर्ट पॉंझिटिव्ह आल्याने तालुक्यात चिंतेचे आहे.
म्हसवडमध्ये दोन महिने शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून करोना योद्ध्याचे काम केले होते. शासनाने लॉंकडाऊन तीननंतर शिथिलता दिल्याने व मुंबई, पुण्यासारख्या करोनाबाधित क्षेत्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सरकारने ई- पासची सुविधा दिल्याने लोकांचे लोंढे गावाकडे आले. या येणाऱ्या लोकांच्या ई- पासच्या नोंदींव्यतिरिक्त छुप्या मार्गाने आलेल्या लोकांची संख्याही जास्त आहे.
म्हसवड शहरातही पुण्या- मुंबईतून आलेल्यांची संख्याही जास्त आहे. या लोकांना प्रशासनाने त्यांच्या घरीच क्वारंटाइन केले होते. अशाच एका होम क्वारंटाईन करण्यात मुंबईहुन आलेल्या व्यक्तिला त्रास होऊ लागल्यामुळे त्या व्यक्तिला व त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंना सोमवारी दि. 25 रोजी फलटणला तपासणीसाठी नेले होते. त्यापैकी पालिका हद्दीतील कोले वस्तीतील एका व्यक्तीचा रिपोर्ट बाधित आला आहे. प्रशासनाने हा परिसर कंटेनमेट झोन जाहीर केला आहे.