भोर -भोर तालुक्यात नेरे आणि नसरापूर पाठोपाठ आता तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातही करोना विषाणूचे लोण पोहोचले असून, रायरी येथील रेणुसेवाडीतील एक तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील आणि भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. दरम्यान, रायरी गावच्या सीमा केल्या आहेत.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार रायरी येथील रेणुसेवाडीतील हा तरुण त्याची पत्नी व दोन मुले यांसह मुंबईहून 13 मे 2020 ला गावी आला होता. त्याच्यासह कुटुंबियांना प्रशासनाने गावाच्या शाळेत क्वारंटाइन केले होते. त्याला त्रास होऊ लागल्याने तो निगुडघर येथील खासगी दवाखान्यात गेला असता डॉक्टरांनी त्याला करोनाची तपासणी करून घेण्यास सांगितले आणि ही माहिती भोरच्या प्रशासनास दिली. त्यानुसार गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी तातडीने रायरी येथे भेट देऊन तरुणाचे रक्ताचे नमुने करोना टेस्टसाठी पुणे येथील लॅबला बुधवारी (दि. 19) पाठवले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पुणे येथे रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने आज त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवायचे की त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधिन असल्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सांगितले. बाधित रुग्णाच्या संसर्गात आलेल्या 13 जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले असल्याचे गट विकास अधिकारी तनपुरे यांनी सांगीतले. रायरी येथे करोना बाधित रुग्ण सापडल्याने रायरी पासून तीन किलोमीटरचा परिसर कंटेंन्मेंट झोन तर पाच किलोमीटरपर्यंत बफर झोन जाहीर केल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.